महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवाजी पार्क येथील संयुक्त प्रचारसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित सभेत बोलताना राज ठाकरेंनी ‘वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात, तंत्र माहीत होतं तेव्हा हा माज येतो’ असे म्हणत मुंबई आणि देश विक्रीला काढल्याचा आरोप केला. मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या या सभेत उपस्थितांना त्यांनी जागृत केले.
राज ठाकरेंनी हिंदी सक्ती प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित करत म्हटले, “मुंबईवर आलेल्या संकटामुळे आम्ही एकत्र आलो. मी वर्षानुवर्षे यावर बोलत आलो, राज्य सरकारने हिंदी सक्ती आणून मराठी माणसाला चाचपडून पाहिले. तुम्ही जागे आहात का? मराठी जिवंत आहे का? २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकारला फेफरे आली, मनाला वाटेल ते करू लागले. कुणाला विचारायचं नाही? हे कोण आहेत लोक?” या शब्दांत त्यांनी सरकारच्या धाडसावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुढे बोलताना राज ठाकरेंनी निवडणूक तंत्रांवर टीका केली. “पैसे फेकले की विकत घेऊ, आला कुठून आत्मविश्वास? पूर्वीच्या सत्ताधाऱ्या जनतेला घाबरायच्या, आता घाबरणं बिबरणं नाही. बोगस मतदार, ईव्हीएमच्या लढाया सुरू आहेत. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती, बदलापूरमध्ये काँग्रेसबरोबर. ६६ जण बिनविरोध निवडले, उद्या आकडा वाढेल. तुळजापूरमध्ये ड्रग्स रॅकेटमधील व्यक्तीला तिकीट, बदलापूरमध्ये बलात्कार आरोपीला नगरसेवक आली कुठून ही हिंमत?” असे म्हणत त्यांनी महायुतीच्या युती आणि उमेदवारांवर हल्ला चढवला.
ही सभा मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला भाजप-शिवसेना (शिंदे गट) कठीण आव्हान देणारी ठरली. ठाकरे बंधूंच्या एकजुटीमुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर युतीने जोर धरला असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण तापले आहे.