केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. राणेंना स्मृती स्थळी येऊ न देण्याची भाषा शिवसेनेच्या काही लोकप्रतिनिधींनी केली होती. यावेळी नारायण राणेंनी अप्रत्यक्ष राजकीय टोला देखील लगावला.
"एवढंच सांगेन, कोणत्याही व्यक्तीचं स्मारक असो, दैवतांचं स्मारक असो, त्याला विरोधाची भाषा करू नये. भावनेचा विचार करावा आणि तसं वक्तव्य करावं. कुणाला वाटत असेल, तर स्वत: बोलावं, डाव्या-उजव्यांना बोलायला लावू नये. जशास तसं उत्तर देण्याबद्दल माझी ख्याती आहे. त्यामुळे कुणीही आपल्यामध्ये मांजरीसारखं आड येऊ नये. ही यात्रा यशस्वी होईल आणि येणारी महानगर पालिका भाजपा जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा या ठिकाणी फुटल्याशिवाय राहणार नाही", असं राणे यावेळी म्हणाले.
"आम्हाला उपदेशाची आवश्यकता नाही"
गर्दी टाळण्यासाठी राजकीय कार्यक्रम करू नयेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. याविषयी विचारणा केली असता राणेंनी उद्धव ठाकरेंनाच टोला लगावला. "राजकीय आम्ही काहीही करत नाही. जनतेला भेटतोय. जनतेच्या आशीर्वादाने तेही बसले आहेत. ते तर आड मार्गाने बसले आहेत. निवडून आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही करोनाची सगळी काळजी, सगळे नियम पाळू. आम्ही शपथ घेतली आहे, त्या शपथेचं पालन करू. आम्हाला उपदेशाची आवश्यकता नाही. जनआशीर्वाद यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहाता फार कमी दिवस राहिले आहेत. वाट पाहा. आमची शक्ती आमच्या विरोधकांना माहिती आहे", असं राणे म्हणाले.