(Ratnagiri Rain ) रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून राजापुर, रत्नागिरी, लांजा, दापोली आणि गुहागर या तालुक्यांत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने अधिकच जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन सतर्क झालं आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, घरे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः राजापुर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे पश्चिम भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 114.13 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून काही तालुक्यांतील नोंद पुढीलप्रमाणे आहे: मंडणगड – 177.50 मिमी, दापोली – 138.85 मिमी, गुहागर – 140.00 मिमी, रत्नागिरी – 123.33 मिमी, लांजा – 118.80 मिमी.
पावसामुळे नदीलगतची भात शेती पूर्णपणे जलमय झाली आहे. नुकतीच पेरणी झालेल्या भात पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. सततच्या पावसामुळे पुढील काही दिवस अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे. प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून संभाव्य धोका लक्षात घेऊन उपाययोजना सुरू आहेत.