मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राजू नाईक आणि दिनेश कुबल यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. ठाण्यात पार पडलेल्या या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाच्या मुंबईतील संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
दिनेश कुबल हे कलीना विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ८९ चे विद्यमान नगरसेवक असून, त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्तेही शिंदे गटात दाखल झाले आहेत. केवळ शिवसेनेतूनच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील रवींद्र घुसळकर, राजू शेट्टी आणि विशाल कनावजे यांसारख्या कार्यकर्त्यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटासोबतच शरद पवार गटालाही मुंबईत एकाचवेळी दुहेरी धक्का बसल्याचं स्पष्ट होत आहे.
शिंदेंचा आक्रमक डाव
पक्षप्रवेशावेळी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या सहकाऱ्यांचं स्वागत करत “शिवसेना ही काम करणाऱ्यांची आणि जनतेशी थेट नातं ठेवणाऱ्यांची आहे” असा संदेश दिला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संघटन मजबूत करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आता अधिक आक्रमक झाल्याचं या घडामोडींमधून दिसून येत आहे.
ठाकरे गट – मनसे युतीतही अंतर्गत तणाव
एका बाजूला पक्षफोडीचा फटका बसत असतानाच, दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंच्या युतीतही जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नसल्याचं चित्र आहे. मराठीबहुल प्रभागांमध्ये मनसे आणि ठाकरे गटात जागावाटपावरून मोठी रस्सीखेच झाली होती. चर्चेनंतर तोडगा निघाल्याचं जरी सांगण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात मनसेसाठी सोडलेल्या वॉर्डांवर ठाकरे गटातील इच्छुकांनी दावा केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
दादर–माहीम परिसर ठरतोय कळीचा
जागावाटपाच्या चर्चेत दादर–माहीम परिसर केंद्रस्थानी ठरला आहे. शिवसेना भवन आणि राज ठाकरे यांचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’ या दोन्ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जागा याच भागात येतात. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिसरातील चार जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या असून दोन जागांवर मनसे उमेदवार असणार आहेत. मनसेच्या वाट्याला १९० आणि १९२ हे मतदारसंघ सोडण्यात आले असले, तरी त्यावरून ठाकरे गटात अस्वस्थता वाढताना दिसते आहे.
आगामी निवडणुकांपूर्वी वाढलेली डोकेदुखी
एकीकडे शिंदे गटाकडून सुरू असलेली जोरदार पक्षबांधणी, तर दुसरीकडे ठाकरे गटातील अंतर्गत असंतोष आणि युतीतील कुरबुरीया सगळ्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांची राजकीय डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे. मुंबईच्या सत्तेसाठी रंगणाऱ्या या लढतीत पुढचे काही दिवस आणखी धक्कादायक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.