सातारा जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली. राज्यभरात झालेल्या पावसामुळे अनेक भागात शेतीचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात बोलताना पाटील यांनी सांगितले की, "राज्यात सर्व पंचनामे पूर्ण होताच केंद्र शासनाच्या 'राष्ट्रीय आपत्ती' निकषानुसार देय असलेली मदत तातडीने वितरित केली जाईल." फलटण, माण, आणि खटाव तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. विशेषतः फलटणमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. या भागातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित काम काही दिवसांत पूर्ण होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यात आमदार सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, फलटण तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, मुख्याधिकारी निखिल मोरे, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांची उपस्थिती होती. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने गंभीर परिणाम घडवले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.