Saamana Editorial  
महाराष्ट्र

Saamana Editorial : 'ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर एकीकडे झुकणार नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे...' सामनातून टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के कर लावला असल्याची घोषणा केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Saamana Editorial ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के कर लावला असल्याची घोषणा केली आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, 'अमेरिकेचे प्रे. ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या कथित मैत्रीचे वस्त्रहरण ट्रम्प रोजच करीत आहेत. या मैत्रीची पिसे ट्रम्प यांनी काढली नाहीत असा एकही दिवस उजाडत नाही. बुधवारीही हा सिलसिला सुरूच राहिला. हिंदुस्थानातून आयात वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आणि मोदी मैत्रीचे आणखी एक पीस उपटले. ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत. रशियाकडून भारताने शस्त्रास्त्रे आणि कच्चे तेल खरेदी केले याचा रागही त्यांनी भारतावर ‘दंड’ आकारण्याची घोषणा करून व्यक्त केला. एकीकडे भारतावर 25 टक्के टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्प यांनी दुसरीकडे पाकिस्तानच्या शरीफ सरकारसोबत व्यापार करार केला. पाकिस्तानातील तेलाचे साठे शोधून ते विकसित करणार असल्याची ग्वाही दिली. ‘भविष्यात कधी तरी पाकिस्तानही भारताला तेल विकेल,’ अशा शब्दांत मोदी यांच्या जखमेवर मीठ चोळले.'

'गुरुवारी त्यांनी या जखमेला आणखी डागण्या दिल्या. रशियासोबत भारताच्या अर्थव्यवस्थेची संभावना त्यांनी ‘बुडणारी’, ‘मृत’ अर्थव्यवस्था अशा शब्दांत केली. हे दोन्ही देश आपल्या मृत अर्थव्यवस्थांना आणखी बुडवू शकतात, असा शापही देऊन टाकला. प्र्रे. ट्रम्प यांचा 25 टक्क्यांचा टॅरिफ बॉम्ब, त्यांनी पाकड्यांसोबत केलेले डिल, पाठोपाठ भारतीय अर्थव्यवस्थेची केलेली संभावना या सर्वच गोष्टी भारतासाठी देश म्हणून भयंकर चीड आणणाऱ्या आणि देशाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणाऱ्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यावरून तात्काळ स्पष्ट आणि सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त होणे अपेक्षित होते. मात्र मोदींपासून शहा-जयशंकर यांच्यापर्यंत सगळ्यांची वाचा बसली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या आणखी एका ‘शॉक’मधून ते सावरलेले नाहीत. लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेला उत्तर देतानाही मोदी ट्रम्प यांचे थेट नाव घेण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बबाबतदेखील ते ना स्वतःच्या हाताची घडी मोडू शकले आहेत ना तोंडाचे कुलूप सोडवू शकले. नाही म्हणायला परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘सूत्रां’च्या हवाल्याने खुलाशाचे एक पिल्लू मोदी सरकारने सोडले आहे. ‘ट्रम्प यांच्या घोषणेचा गांभीर्याने अभ्यास केला जात असून राष्ट्रीय हितांची रक्षा करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. यासंदर्भात कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही,’ असे भारताने म्हणे ठणकावून सांगितले आहे.'

'अरे, झुकणार नाही ना, मग तसे बेधडक सांगा. परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘सूत्रा’मागे का लपता? पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र मंत्री आपली तोंडे उघडायला का तयार नाहीत? ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर एकीकडे झुकणार नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे ‘अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार कराराबाबत भारत पूर्णपणे सकारात्मक आहे,’ अशा चिपळ्याही वाजवायच्या. कमरेत वाकून ‘मिलॉर्ड’ ट्रम्प प्रसन्न होतील या आशाळभूतपणे पाहायचे. मोदी सरकारची ही ‘ताकद’ प्रे. ट्रम्प पुरते ओळखून आहेत. म्हणूनच मित्रत्वाचा उल्लेख करीत ते रोज मोदी-मैत्रीची पिसे उपटत आहेत. मोदींना या मैत्रीची जागा दाखवून देत आहेत. ‘टॅरिफ लादून बुक्क्यांचा मार’ देत आहेत. तो बिनबोभाट सहन करण्याशिवाय मोदींकडे दुसरा पर्याय तरी कुठे आहे? मित्र म्हणून मोदी यांनी ट्रम्प यांच्या गळ्यात गळा घालून स्वतःला मिरवले खरे, परंतु त्यांचा हा मित्र भारताचा गळा कापत आहे आणि ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असे म्हणणारे मोदी एका हतबलतेने मौन धारण करून गप्प आहेत. ना ते ट्रम्प यांचे थेट नाव घेत आहेत ना त्यांचा टॅरिफ बॉम्ब निकामी करण्याचे धाडस दाखवत आहेत. मोदी त्यांच्यासमोर एवढे हतबल का आहेत? या प्रश्नाचे उत्तर देशातील जनतेला हवे आहे'असे सामनातून म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Malad : मुंबईतील मालाडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Update live : शेतकरी क्रांती संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन

Mumbai Local Megablock : लोकलचं वेळापत्रक बघून करा प्रवास; तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Ganesh Visarjan : 6 फुटांच्या मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन; POP विसर्जनासाठी मार्गदर्शक सूचना