मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी निमंत्रणावर दिलेल्या “मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो!” या मिश्किल प्रतिक्रियेवर वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी ट्विट करत म्हटलं
“राज ठाकरे मांगे ‘मटन हंडी, मटन हंडी’... यही तो है ठाकरे के सोच की हंडी... चौक न जाना, चौक न जाना, अगर ये मांगे ‘भोंगे जोरो से बजे, जोर से बजे भाईजान ओह भाई’...”
सदावर्तेंच्या या शब्दांनी राज ठाकरे यांची विनोदी टिप्पणी थेट राजकीय टीकेच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दहीहंडीचं निमंत्रण आणि ‘मटण हंडी’चा ट्विस्ट
मुंबईतील एल्फिन्स्टन रोड – प्रभादेवी परिसरात होणाऱ्या दहीकला उत्सवासाठी आयोजक आणि मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी नुकतंच राज ठाकरे यांना औपचारिक निमंत्रण दिलं. निमंत्रण स्वीकारताना राज ठाकरे हसत म्हणाले — “मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो!”
त्यांच्या या प्रतिक्रियेनं उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मटण विक्री बंदीच्या निर्णयावरून राज्यात वाद सुरू असताना केलेला हा उल्लेख सूचक राजकीय संदेश म्हणूनही पाहिला जात आहे.
सदावर्तेंच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या शब्दांना समर्थन दिलं तर काहींनी राज ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीने वैयक्तिक टीका करणे अनुचित असल्याचं म्हटलं.
दरम्यान, राज ठाकरे यांनी या ट्विटवर अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. मात्र, त्यांच्या एका हलक्याफुलक्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा ‘मटन हंडी’चा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय, हे निश्चित आहे.