राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. मतदार याद्यांतील अनियमितता आणि कथित बोगस मतदारांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात तब्बल 96 लाख बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी त्यावर हिंदू-मुस्लिम मतदार या मुद्द्यावरून प्रतिउत्तर दिलं. मात्र, त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आता जोरदार पलटवार केला आहे.
संदीप देशपांडे यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “नितेश राणेंच्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे की भाजपचा हे समजत नाही. हिंदू-मुस्लिम मतदार असा भेदभाव फक्त राणेंच्याच डोक्यात येऊ शकतो. आमच्यासाठी फक्त बोगस मतदार महत्वाचे आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जे घोळ झाले ते एकाच वेळी झाले आहेत.” देशपांडे पुढे म्हणाले, “नितेश राणेंनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. त्यांना आचार्य अत्रे यांचं पुस्तक पाठवीन, म्हणजे थोडा संदर्भ मिळेल.” देशपांडे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं, “राज ठाकरे स्वतःच्या विचारांवर चालतात. आम्ही राणेंसारखे दरवेळी कुबड्या बदलत नाही. ते कधी काँग्रेसमध्ये तर कधी भाजपमध्ये असतात. आम्ही कणकवलीतही मतदार याद्यांची तपासणी करणार आहोत.” त्यांनी टोला लगावत म्हटलं, “आधी संघावर टीका करायची आणि मग त्यांचीच चड्डी घालायची.” या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मनसे नेते पुढे म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय, पण राग भाजपला का येतो? वाढवण भागात केवळ मराठी लोकांनाच नोकरी देतात का? असा प्रश्न विचारला, तर त्यातून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करणं ही राणेंची आणि भाजपची पद्धत आहे.” देशपांडे यांनी तसेच सवाल केला की, “प्रश्न अदानी-अंबानींविषयी असताना भाजप नेत्यांना एवढा राग का येतो? या दोघांशी त्यांचे नेमके संबंध काय आहेत, हे स्पष्ट करावं.” राज ठाकरे यांच्या अलीकडील सभेचा उल्लेख करत देशपांडे म्हणाले, “राज ठाकरे हे मुद्देसूद आणि तथ्यांवर आधारित बोलतात. त्यांनी मांडलेले विचार नेहमी लोकांच्या चिंतनाला चालना देतात.” मात्र, त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, “जर मतदार चोरीचा मुद्दा खरा असेल, तर तो लोकसभा निवडणुकांनंतर का उचलला गेला नाही? त्या वेळी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार जिंकले होते, पण तेव्हा कोणाकडूनही अशा आरोपांचा उल्लेख झाला नव्हता.”
देशपांडे पुढे म्हणाले, “लोकसभेच्या वेळी ज्या ठिकाणी लाखो मतांची देवाणघेवाण झाली, तेव्हा कोणालाही व्होट जिहाद आठवला नाही. हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले, पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले, तेव्हा कोणीच बोलले नाही. मात्र आता राज ठाकरे यांनी बोगस मतदारांचा विषय उपस्थित केला, तर भाजपला राग येतो. लोकसभेनंतर ज्या समाजाने हिरव्या गुलालाला उत्तर भगव्या गुलालाने दिलं, तो समाज पुन्हा हिंदुत्व विचारांचं सरकार आणेल.” या संपूर्ण वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. एका बाजूला राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर दबाव वाढवला आहे, तर दुसरीकडे भाजप नेते आणि मनसे यांच्यातील “मतदार यादी वाद” आता राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.