वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्री पद पुन्हा शिवसेनेकडे कायम राहिले. अखेर रोहयो, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आजच राज्य सरकारने त्यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त केले.
पूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेचे नेते, वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे होते. परंतु त्यांना राजीनामा द्यावा लागल्याने नव्या पालकमंत्र्यांचा शोध सुरू होता. एकनाथ शिंदे, अनिल परब, शंभूराजे देसाई अशी काही नवे चर्चेत होती, त्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांकडून लॉबिंग पण सुरू होती. त्याचवेळी काँग्रेसनेसुद्धा यवतमाळचे पालकमंत्री पद अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांना दिले जावे यासाठी प्रयत्न चालविले होते. 1 मे महाराष्ट्र दिनापूर्वी पालकमंत्री घोषित होईल, असे सांगितले जात होते. अखेर शुक्रवारी त्याचा मुहुर्त सापडला. औरंगाबाद येथील शिवसेना नेते, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपविली गेली.