नवी दिल्ली, दि. ३ (प्रतिनिधी) ; ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आज संसदेत रेल्वेच्या समस्यांबाबत सरकारवर ताशेरे ओढले. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी परिस्थिती असलेल्या मध्य रेल्वेच्या विलंब आणि रद्दी करणामुळे त्रस्त झालेल्या समस्येतून मुंबईकरांची सुटका करण्यात यावी. शिवाय याला जबाबदार असणा-या रेल्वे अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खा. संजय दिना पाटील यांनी संसदेत केली.
रेल्वे ही मुंबईची जीवन वाहिनी असून दररोज रेल्वेने सुमारे 40 लाख प्रवाशी प्रवास करतात. मात्र गेल्या वर्षांपासून मध्य रेल्वेच्या समस्येत वाढ झाली असून विलंब आणि वारंवार रेल्वे गाड्या रद्द करीत असल्यामुळे प्रवाशांना आपल्या नियोजीत स्थळी पोहचण्यास विलंब होतो. शिवाय शालेय विद्यार्थ्यांना त्याचा सर्वात जास्त फटका बसत असून मध्य रेल्वेच्या बेजबाबदार पणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते. त्यांचा अभ्यास बुडतो, परीक्षा रद्द होतात. याला रेल्वेचे अधिकारी जबाबदार असून त्यांना वारंवार विनंती करुनही ते या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शिवाय मुंबईकरांची या समस्यातून कायमची सुटका करावी, अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत केली.