कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये मराठी माणसाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं बाहेरच्या टोळीला बोलावून सोसायटीमध्ये मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतियांनी काल हल्ले केले. मराठी माणसे घाणेरडी आहेत, मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही. मराठी माणसाला घाणेरड्या शिव्या घातल्या. मुंबईतसुद्धा मराठी बोलायचे नाही. मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत. या महाराष्ट्रामध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली. मराठी माणसाच्या हक्कासाठी. भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला ते यासाठीच की इथे मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी.
कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागले आहेत. मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरु आहेत. मला जेव्हा ईडीने अटक केली. तेव्हा माझे वाक्य आहे की, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा. प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणारा, प्रत्येक संस्था, संघटना, व्यक्तीवरती हे हल्ले सुरु आहेत. हे फार मोठे राष्ट्रीय कारस्थान आहे. मुंबईचे गुजरातीकरण करायचे, उत्तर भारतीयकरण करायचे आणि मराठी माणसाला येथून हद्दपार करायचे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कालचा मराठी माणसावरचा हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना. भारतीय जनता पक्षाची भूमिका महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्यासंदर्भातली आहे. असे संजय राऊत म्हणाले.