थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sanjay Raut) मुंबईत काल राज आणि उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांनी ' लाव रे व्हिडीओ' म्हणत गौतम अदानींवर निशाणा साधत 2014 ते 2024 पर्यंत दहा वर्षात त्यांचे उद्योग कसे वाढत गेले हे नकाशाच्या माध्यमातून दाखवलं.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं अदानीसंदर्भात ते आतापर्यंत देशाच्या इतिहासात कुणीच केलं नाही. दूध का दूध पानी का पानी. महाराष्ट्राच नव्हे, मुंबई नव्हे तर देश एका उद्योगपतीच्या अंमलाखाली कसा आणला गेला आहे. म्हणजे प्रधानमंत्री मोदी नसून अदानी आहेत की काय? असा प्रश्न पडलाय आम्हाला."
"काय चाललंय या देशामध्ये. काल ते चित्र पाहून या देशाच्या जनतेला धक्का बसला. अदानीच का गेल्या 5-10 वर्षामध्ये? कारण अदानी हा भ्रष्टाचाराचा पोशिंदा आहे. मुंबई आणि महाराष्ट्रावर त्यांचा सर्वात जास्त डोळा आहे. म्हणून आमची लढाई आहे." असे संजय राऊत म्हणाले.
Summary
राज ठाकरेंनी दूध का दूध पानी का पानी केलं-राऊत
देशाच्या इतिहासात असं प्रेझेंटेशन कुणीच केलं नाही-राऊत
सगळे प्रकल्प अदानींनाच का?-राऊत