नाशिकमधील तपोवन परिसरात कुंभमेळ्याच्या तयारीसाठी झाडे तोडण्याचा निर्णय झाल्यानंतर नागरिकांमध्ये मोठा विरोध सुरू आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना आणि नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर झाडवाचवा मोहिमेला बळ देण्यासाठी अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.
सकाळी सयाजी शिंदे हे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह शिवतीर्थ येथे पोहोचले. या भेटीमध्ये तपोवनातील झाडतोड, नागरिकांचा वाढता विरोध आणि पुढील लढ्याची रणनीती यावर चर्चा झाल्याचे समजते. मनसेने आणखी आधीच झाडतोडीला विरोध दर्शवत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मनसे आणि पर्यावरण चळवळीतील सयाजी शिंदे हे दोघे एकत्र आल्याने या आंदोलनाला आणखी जोर मिळण्याची शक्यता आहे.
तपोवनातील झाडतोडीच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी सयाजी शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, “इथली लहान झाडेसुद्धा तोडू नयेत. झाडं म्हणजे आमचे आईबाप आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला तर आम्ही गप्प बसणार नाही.” त्यांच्या या भूमिकेला मोठा जनसमर्थन मिळाला होता. याचवेळी त्यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही सवाल उपस्थित करत “ते या भागाचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी नागरिकांना स्पष्ट उत्तर द्यावे,” असे म्हटले होते.
कुंभमेळ्यासाठी ‘साधूग्राम’ उभारण्याच्या नावाखाली होणाऱ्या झाडतोडीला नाशिकमध्ये मोठा विरोध आहे. झाडे तोडल्यास परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडेल, तापमान वाढेल आणि भविष्यात नाशिकला आपत्तींचा धोका उद्भवू शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक संघटना, विद्यार्थी आणि रहिवासी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले असून दररोज निदर्शने सुरू आहेत.
आता राज ठाकरे आणि सयाजी शिंदे यांच्या भेटीनंतर या मुद्द्याला नवे राजकीय परिमाण मिळाले आहे. मनसेची भूमिका आक्रमक असल्याने हा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार झाडतोडीच्या निर्णयावर ठाम असले तरी नागरिकांचा विरोध वाढत चालला आहे. तपोवनातील झाडांचे भवितव्य पुढील काही दिवसांत ठरणार असून, नाशिकमध्ये पर्यावरण जपण्यासाठीची ही लढाई आता अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे.