छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील फलकांवर असलेले उर्दूतील छत्रपती संभाजीनगर हे नाव हटवण्यात आल्यानंतर शहरात अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाचा तीव्र विरोध करत सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) संघटनेने आज रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने मोठा बंदोबस्त उभारून संपूर्ण परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप दिले आहे.
उर्दू नाव हटवल्यानंतर मुस्लिम संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे. SDPI चे स्थानिक पदाधिकारी म्हणतात की, “उर्दूतील नाव अचानक का हटवले? कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला गेला? उर्दू नाव लावण्यात काय अडचण होती?” असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत आणि उर्दू नाव तात्काळ पुन्हा लावावे, अशी SDPI ची स्पष्ट मागणी आहे. नाव हटवल्याच्या प्रकारामागे राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
आंदोलनाची घोषणा होताच पोलिस दल सतर्क झाले आहे. स्थानकावर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पोलिस, लोहमार्ग पोलिस (GRP) आणि रेल्वे पोलिस दल (RPF) तैनात करण्यात आले आहेत. आंदोलनकर्ते स्थानकात शिरू नयेत यासाठी मुख्य गेट आणि प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांनी कडेकोट नियंत्रण ठेवले आहे. बॅरिकेट्स, वायर जाळ्या आणि तपासणी नाक्यांमुळे प्रवाशांनाही गैरसोय होत आहे. स्थानक परिसरात सकाळपासूनच पोलिसांची सतत गस्त सुरू आहे.
रेल्वे प्रशासनानेही खबरदारी म्हणून काही गाड्यांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल केले आहेत. गर्दी वाढू नये म्हणून स्थानकात प्रवेश देताना अतिरिक्त पोलिस कर्मचारी व्यवस्था सांभाळताना दिसत होते. आंदोलकांनी रेल रोको करण्याची भूमिका स्पष्ट केल्याने पोलिसांनी सुरक्षेचे सर्व उपाय योजले आहेत. कोणताही अनुचित प्रसंग घडू नये म्हणून वरिष्ठ अधिकारी स्वतः परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
SDPI ने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे स्थानक परिसरात तणावाचे वातावरण असून सामान्य नागरिक आणि प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नाव हटवण्याचा मुद्दा वेगाने राजकीय होऊ लागल्याने शहरात चर्चा रंगत आहे. प्रशासनाने उर्दू नाव का हटवले याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
एकूणच, उर्दूतील नाव हटवण्याच्या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. SDPI च्या आंदोलनामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेची कसोटी लागली असून, आजचा दिवस प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.