(Ghrishneshwar Mandir ) घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात आज श्रावण सोमवारनिम्मित दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी मंदिरातील एका सेवेकऱ्यावर बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंद असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश देण्यास नकार दिल्याने या भाविकांनी संतापून सेवेकऱ्याला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी मंदिराच्या बंद दरवाजातून प्रवेश देण्याचा आग्रह केला. मात्र, नियमानुसार सेवेकऱ्याने स्पष्ट नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या भाविकांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या मारहाणीची घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामध्ये भाविकांनी सेवेकऱ्याला धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचे स्पष्टपणे दिसून येते.
घटनेनंतर सेवेकऱ्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मंदिर प्रशासनाने या प्रकाराचा निषेध केला असून संबंधित भाविकांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. मंदिर परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.