मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे. या यादीत सात प्रमुख वॉर्डांतील उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, पक्षाने विचारपूर्वक रणनीती आखल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि सहअध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या मान्यतेने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. सात उमेदवारांपैकी चार जागांवर महिला उमेदवारांना संधी देण्यात आली असून, सर्वसाधारण गटाबरोबरच अनुसूचित जाती आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना स्थान मिळाले आहे. या निवडीमुळे पक्षाने विविध घटकांना प्राधान्य देत मुंबईतील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने हे पावले उचलत आपली ताकद दाखवली असून, आता इतर पक्षांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. ही पहिली यादी असल्याने लवकरच आणखी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे कशी बदलतील आणि पक्षाची रणनीती कितपत यशस्वी होईल, याकडे सध्य सर्वांचे लक्ष लागले आहे.