महाराष्ट्राच्या विधानभवनावर पुन्हा एकदा भगवा फडकल्यानंतरचा पहिला वर्धापनदिन शिवसेना आज साजरा करत आहे. करोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन नेहमीच्या जोश, जल्लोषाविना होणार आहे. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या बदलललेल्या राजकीय भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे बोलणार का?, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता शिवसेनेचे नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसोबत ठाकरे यांचा संवाद व्हावा यासाठी शाखा-शाखांवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गेली सुमारे ५० वर्षे राजकीय विरोधक राहिलेल्या काँग्रेसशी शिवसेनेनं आघाडी केल्यानं शिवसेनेमध्ये सध्या उलटसुलट चर्चा आहे. शिवसेनेच्या विरोधकांकडून काही प्रमाणात भ्रमही निर्माण केले जात आहेत. या सगळ्यांवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.