(Ghrishneshwar Mandir) आज पहिला श्रावण सोमवार आहे.पहिल्या सोमवारी राज्यातील सर्वच शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली.'घृष्णेश्वर' हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं ज्योतिर्लिंग मानलं जातं. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदाही पहिल्या श्रावणी सोमवारी पहाटेपासूनच मंदिर परिसरात “हर हर महादेव” च्या जयघोषात भक्तांचा उत्साह पाहायला मिळाला.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर विश्वस्त मंडळाकडून दर्शनासाठी रांगा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय मदत केंद्र यासह आवश्यक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. याशिवाय पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला असून मंदिर परिसरात अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वयंसेवकही सेवेत कार्यरत असून संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण तयार करण्यात आले आहे.प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.