(Trimbakeshwar Temple) श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ही गर्दी व्यवस्थित नियंत्रित ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदा नाशिक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ड्रोनच्या माध्यमातून कडक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
देशभरातून लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. ड्रोनच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण, अनुशासन राखणे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
यासोबतच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने पहाटे 5 वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला असून रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. दरम्यान, श्रावण महिन्यात व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना अधिक वेळ आणि सुविधा मिळू शकतील.
पोलीस प्रशासन आणि मंदिर ट्रस्टने एकत्रितपणे या महिन्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष तयारी केली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.