श्री क्षेत्र अरण (जि. सोलापूर) संत शिरोमणी श्री सावता महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र अरणला अखेर "अ वर्ग" तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला आहे. महायुती सरकारकडून यासंदर्भातील शासन निर्णय काल दि. 16 मे 2025 निर्गमित करण्यात आला असून, यामुळे या पवित्र भूमीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दि 4 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरण येथील कार्यक्रमात बोलताना, अरणला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते आणि ते कालच्या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केले आहे. छगन भुजबळ,अतुल सावे, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, रुपालीताई चाकणकर यांच्यासह लाखो भाविक या कार्यक्रमास त्यावेळी उपस्थित होते. या निर्णयामागे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी महायुती सरकारने श्री क्षेत्र अरणला "अ वर्ग" दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर दि. 3 जानेवारी 2025 रोजी नायगाव (सातारा) येथे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राचा 'अ' दर्जा आणि विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर ठाम मागणी केली होती. अखेरीस या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अरणभेंडी हे संत सावता महाराजांचे संजीवन समाधीस्थळ असलेले तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थान आहे. राज्यभरातून भाविक व पर्यटक येथे नियमितपणे भेट देतात. श्री क्षेत्र अरणसाठी सुमारे 140 कोटी रुपयांचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. आता "अ वर्ग" दर्जा प्राप्त झाल्यामुळे या आराखड्याच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे. 1985 साली नाशिकच्या काही मंडळींनी लोकसहभागातून सभामंडप उभारून या तीर्थक्षेत्राच्या विकासाला सुरुवात केली होती. आज शासन निर्णयामुळे त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याची भावना भाविकांमध्ये आहे.