थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना रायगड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाडनंतर आता श्रीवर्धन नगरपरिषदेतही राष्ट्रवादी काँग्रेस (तटकरे गट) यांना पराभवाचा सामना करावा लागला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सत्तेवर झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. अतुल चौगुले यांनी नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत श्रीवर्धनच्या राजकारणात नवे पर्व सुरू केल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या निवडणुकीत त्याच जिल्ह्यातील महाड आणि श्रीवर्धन या दोन्ही महत्त्वाच्या नगरपरिषदांमध्ये तटकरे गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे श्रीवर्धन मतदारसंघ हा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा मतदारसंघ असल्याने हा निकाल राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत माजी नगराध्यक्ष अभिनंदन जितेंद्र सातनक यांचा अनपेक्षित पराभव झाला. सातनक हे तटकरे गटाचे प्रमुख चेहरे मानले जात होते. मात्र, मतदारांनी यावेळी बदलाची भूमिका घेतल्याचे निकालातून स्पष्ट झाले. स्थानिक विकासकामांबाबत असलेली नाराजी, मूलभूत सुविधांतील त्रुटी आणि बदलती राजकीय हवा यांचा फटका तटकरे गटाला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे ॲड. अतुल चौगुले यांनी नगराध्यक्षपदाची बाजी मारली. त्यांच्या विजयानंतर श्रीवर्धन नगरपरिषदेतील सत्तासमीकरण पूर्णतः बदलले असून, ठाकरे गटाला येथे निर्णायक स्थान मिळाले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चौगुले यांनी पारदर्शक कारभार, स्थानिक प्रश्नांवर थेट उपाययोजना आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करण्याचे आश्वासन दिले होते. मतदारांनी त्यांच्या या भूमिकेवर विश्वास टाकल्याचे निकालातून दिसून येते. विजयानंतर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष ॲड. अतुल चोगले म्हणाले की, “श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा या प्राधान्यक्रमावर असतील. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन, कोणताही भेदभाव न करता लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा आमचा निर्धार आहे.”
या निकालामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय चित्र अधिकच रंजक बनले आहे. महाडमध्ये शिवसेनेचे सुनील कविस्कर यांनी मिळवलेला विजय आणि आता श्रीवर्धनमधील सत्तांतर यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनीही तटकरे गटाला सलग धक्के दिल्याचे चित्र आहे. येत्या काळात याचा परिणाम जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर आणि आगामी राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूक निकालाने केवळ नगराध्यक्षपदाचाच निर्णय दिलेला नाही, तर रायगडच्या राजकारणाला नवी दिशा देणारा संदेशही मतदारांनी दिला आहे. सत्तांतरानंतर आता नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या अपेक्षा पूर्ण होतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
• श्रीवर्धन नगरपरिषदेत ठाकरे गटाचा विजय
• ॲड. अतुल चौगुले नगराध्यक्षपदी निवड
• तटकरे गटाच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का
• रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलले