यंदाच्या वर्षातील चांदीच्या ऐतिहासिक चालमुळे गुंतवणूकदार सोनंसोडून चांदीतील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. तुम्हीपण चांदीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहिती असली पाहिजे.
चांदी चमकतेय, दर लवकरच नवे उच्चांक गाठणार?
सोलर पॅनल, ईव्ही वाहने आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर झपाट्याने वाढत आहे. या सगळ्या तंत्रज्ञानात चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे. याच कारणामुळे चांदीचे भाव सातत्याने वर जात असून, लवकरच प्रतिकिलो दर 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
पर्यावरणपूरक उपायांकडे जगाचा कल वाढल्याने ईव्ही, बॅटरी, सेमीकंडक्टर आणि सोलर उपकरणांची निर्मिती वाढली आहे. यामध्ये चांदी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणारी मागणी आता एकूण वापराच्या निम्म्याहून अधिक झाली आहे.
दरम्यान, चीनने चांदी थेट विकण्याऐवजी त्यावर आधारित उत्पादने निर्यात करण्यावर भर दिला असून, चांदीच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. यामुळे जागतिक बाजारात पुरवठा कमी झाला असून मागणी आणि उपलब्धता यातील दरी वाढत आहे. ईव्ही क्षेत्रातच चांदीचा वापर झपाट्याने वाढत असून एका वाहनात साधारण ५० ग्रॅम चांदी लागते. त्यामुळे या क्षेत्रातूनच चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सध्या दरांमध्ये थोडीफार चढ-उतार दिसू शकते, कारण गुंतवणूकदार नफा काढण्याची शक्यता आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असून, दीर्घकाळात चांदीचे दर आणखी वाढण्याचीच शक्यता आहे.