( Sonu Sood ) लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्याचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये 75 वर्षीय वृद्ध शेतकरी स्वतः नांगर ओढताना आणि त्यांची पत्नी मागून नांगर चालवत असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे शेतीसाठी बैल किंवा यंत्रसामग्री उपलब्ध नव्हती, त्यामुळे दोघांनी स्वतःच्या श्रमावर शेतीची कामं करण्याचा निर्णय घेतला.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता बॉलिवूड अभिनेते सोनू सूद यांनी तात्काळ याची दखल घेत सोशल मीडियावरून मदतीची घोषणा केली. त्यांनी लिहिलं,"आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।" यानंतर अनेक लोकांनी त्यांचे कौतुक केले.
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनही सक्रिय झालं आहे. तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी अंबादास पवार यांच्या शेतावर भेट दिली असून, त्यांना सवलतीच्या दरात शेती उपकरणं आणि यंत्रसामग्री देण्यात येणार आहे. कृषी ओळखपत्र नसल्याने त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, लवकरच त्यांना 1.25 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे.