थोडक्यात
दिवाळीत मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 944 गाड्या धावणार
प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
(Central Railway) दिवाळीत मध्य रेल्वेने यंदा 944 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. या गाड्या आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही प्रकारच्या असणार असून मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आदी शहरांतून उत्तर व दक्षिण भारतातील प्रमुख ठिकाणांकडे धावतील. यात कोल्हापूर, सावंतवाडी, गोरखपूर, दानापूर, निजामुद्दीन, सांगानेर, तिरुवनंतपुरम नॉर्थ आणि कलबुरगी यांसारख्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयी करण्यात आल्या आहेत. वातानुकूलित, शयनयान व अनारक्षित डब्यांसह मिश्र स्वरूपातील गाड्यांचा यात समावेश असेल.
या काळात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर प्रवासी आपल्या मूळ गावी परततात. या काळात अतिरिक्त गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. महत्त्वाच्या स्थानकांवर 'मे आय हेल्प यू' बूथ सुरू केले जाणार आहेत. प्रमुख स्थानकांवर तिकीट काउंटरची संख्या वाढवली जाणार असून सीएसएमटी व एलटीटी येथे प्रवाशांसाठी स्वतंत्र 'होल्डिंग एरिया' उभारले जातील.
याशिवाय सुरक्षा लक्षात घेता आरपीएफ कर्मचारी आणि अतिरिक्त तिकीट तपासक तैनात केले जाणार आहेत. 26 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत या विशेष गाड्या चालवल्या जातील. महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे व कोल्हापूरकडे तसेच दक्षिणेकडील करीमनगर, काझीपेट, कोचुवेली आणि बेंगळुरूसारख्या शहरांकडेही विशेष गाड्या धावणार आहेत.