आषाढी वारी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नमो एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नियोजन केलेल्या या नमो एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवतील. या एक्सप्रेसच्या माध्यमातून वारकरी व भाविकांना मुंबई ते पंढरपूर व पंढरपूर ते मुंबई असा मोफत प्रवास करता येणार आहे.
मंगल प्रभात लोढा म्हणाले, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राचे लोक दर्शनासाठी जात असतात.आम्ही पण पाठवायची व्यवस्था करत आहोत. नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे.ही तीर्थ यात्रा आहे. ज्यांना वंदे मातरम् बोलायचे नाही, हा हिंदुस्तान आहे. येथे राहायचे असेल तर सर्व संस्कृतीचे पालन करावे लागेल.
आषाढी एकादशी निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून हजारो भाविक व वारकरी आज पंढरपूरला रवाना होत आहेत. या भाविकांसाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नमो एक्सप्रेस या विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. या ट्रेनने प्रवास करण्यासाठी दिंडीतून येणाऱ्या प्रवाशांच्या "ज्ञानोबा माऊली"च्या गजराने अवघे रेल्वे स्थानक दुमदुमले आहे.