लोकशाही न्यूज नेटवर्क
जेजुरीच्या मार्तंड देव संस्थानाकडून जेजुरी गडावर उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या १२ फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद रंगला आहे. तर, दुसरीकडे कोकणातही वेगळ्याच पुतळ्यांवरून राजकारण रंगले आहे. ते इतके विकोपाला गेले आहे की, थेट दंगल नियंत्रण पथकच तैनात करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर शिवसेना आणि भाजपातील तणाव वाढला आहे. अशातच भाजपा खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा सुरू झाली. त्यावर 'राणेंसारख्या एका नॉन-मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आल्यास ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल,' अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली. यावरून नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना, 'आमच्यावर टीका करताना जी भाषा वापरली जात आहे ती बदली नाही तर, जिथे दिसाल तिथे मी तुम्हाला फटके घालीन', अशी धमकी दिली.
यावरून सिंधुदुर्गातील वातावरण आणखी तापले. शिवसेनेने काल कणकवलीत निलेश राणेंच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन केले. तर, आज भाजपाकडून खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले तसेच पुतळ्याचे दहन केले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या कणकवली शहरात तैनात केल्या आहेत.