(Amravati) अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी आश्रम शाळेत दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून 3 मुली जखमी झाल्या आहेत.
घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाण्याची टाकी वापरासाठी उघडण्यात आली असताना अचानक टाकीची भिंत कोसळली. यामध्ये सुमरती सोमा जामुनकर या विद्यार्थिनीवर ढिगारा पडला. तिला इतर तीन विद्यार्थिनींसह तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झाल्यामुळे सुमरतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
जखमी विद्यार्थिनींवर अचलपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शाळेचे कर्मचारी व ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समाजातून संताप व्यक्त होत आहे.