(Jalgaon ) जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणारा चैतन्य शंकर मराठे (वय 13, रा. मुंढोळदे) बुधवारी रोजच्या प्रमाणे सकाळी शाळेच्या बसने शाळेत पोहोचला होता. दुपारच्या सुट्टीदरम्यान जेवण करून झाल्यावर तो शाळेच्या मैदानावर मित्रांसोबत खेळत होता. काही वेळाने थकवा वाटल्याने बाकावर बसला. मात्र काही क्षणांतच तो खाली कोसळला.
चैतन्य बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केलं. चैतन्यच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून, हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर अंतिम निष्कर्ष स्पष्ट होईल.
चैतन्यच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मुंढोळदे गावात शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहे.