पुणे : विद्यार्थी आणि एनएसयुआय कार्यकर्त्यांकडून आज पुणे विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये कॅरी फॉरवर्ड योजना राबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यासंदर्भात जीआर काढूनही विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून अॅडमिशन नाकारत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने त्यांना कॅरी-ऑन सुविधा एकवेळचा उपाय म्हणून परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत जीआरही काढण्यात आला होता. परंतु, या जीआरकडे दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठ प्रशासन अॅडमिशन नाकारत असल्याचा आरोप विद्यार्थी आणि एनएसयुआयने केला आहे.
प्रशासनाविरोधात विद्यार्थी आणि एनएसयुआय कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. या प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पाय, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या आहेत.