पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, तसेच ग्रामीण भागातील खडकवासला , भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. पुढच्या 24 तासांतही मुसळधार पावसाची नोंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुणे हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने अग्निशमन दल रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हणाल्या की, पुणे आणि परिसरात पाऊस सुरू आहे. यामुळे शहराचा बहुतांश भागात रस्त्यांवर पाणी साठले आहे . याखेरीज काही सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत मी स्वतः जिल्हाधिकारी,पुणे आणि जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, ज्या नागरीकांना मदतीची गरज आहे तिथं प्रशासकीय यंत्रणेसह आम्ही सर्वजण उपलब्ध आहोत. नागरीकांना देखील विनंती आहे की,अत्यंत महत्वाचे व गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे, काळजी घ्या. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.