( Suraj Chavan )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान लातूरमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत पत्ते फेकून निषेध नोंदवला. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.
याच पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सूरज चव्हाण म्हणाले की, "काल लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग त्याठिकाणी अनावर झाला होता."
"आमच्या नेतृत्वाबद्दल त्याठिकाणी असंविधानिक शब्द वापरला म्हणून आमच्याकडून तशी कृती झाली. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाटगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झाले आहेत ते दूर करेन."असे ते म्हणाले.