महाराष्ट्र

रत्नागिरीत एकाचवेळी 21 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

Published by : Lokshahi News

निसार शेख, रत्नागिरी | रत्नागिरी शहरात एकाचवेळी 21 कुत्र्यांना विष घालून मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर प्राणीमित्र संघटनांसह अन्य संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकाचवेळी मारुती मंदिर परिसरात कुत्र्यांना अन्नातून विष घातल्याने विष घालणारे नेमके कोण? असा प्रश्न उपस्थित झाला असून मृत 21 कुत्र्यांचे पोस्टमार्टम केले असून अज्ञाताविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वपित्री अमावस्या संपता संपता रत्नागिरीत चक्क कुत्र्यांवर विषप्रयोग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 21 कुत्र्यांवर अन्नातून विषप्रयोग केल्याचे पुढे आले आहे. सनील उदय डोंगरे यांना स्वीटी नामक तरूणीने कुत्रे मयत झाल्याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळताच सनील हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी आले. यावेळी एक-दोन कुत्रे मृतावस्थेत मिळून आले. यानंतर त्यांनी नजीकच्या परिसरात पाहणी केली असता आरोग्यमंदिर ते पटवर्धनवाडी येथे मोठ्या प्रमाणात कुत्रे रस्त्यावर मृतावस्थेत दिसून आले. एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ज्या ज्या ठिकाणी कुत्रे मयत झाले होते त्या त्या ठिकाणी दहीभात, कोशिंबीर व काही ठिकाणी चिकन भात रस्त्यावर मिळून आला होता. त्यामुळे अन्नातूनच विष घातले असावे असा संशय सार्‍यांचा बळावला.

याप्रकरणी सनील उदय डोंगरे यांनी शहर पोलीस स्थानकात धाव घेतली व अज्ञाताविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादंविक 428, प्राण्यांना क्रूरतेने वागविणे अधिनियम 1960 चे कलम 11 (जी) (टी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, हा प्रकार उघडकीस येताच रात्रभर शहरात पोलिसांची शोधमोहिम सुरू झाली. रस्त्यारस्त्यावर कुत्रे मृतावस्थेत दिसू लागले. हे कुत्रे उचलायचे कुणी? नगर परिषद कर्मचार्‍यांचे फोन नॉट रिचेबल झाले होते तर काही लोकप्रतिनिधींना संपर्क केला असता त्यांचे फोन स्वीच ऑफ येत होते. त्यामुळे कुत्रे उचलण्यावरून वाद निर्माण झाला होता. अखेरीस पोलिसांनी पुढाकार घेऊन 21 कुत्रे झाडगाव पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविले. या ठिकाणी या कुत्र्यांचे पोस्टमार्टम करण्यात आले.

पोलिसांनी कुत्रे ज्या ठिकाणी मृतावस्थेत सापडले त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले अन्न सॅम्पल म्हणून घेतले आहे. अन्नाचे हे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर या 21 कुत्र्यांच्या मृत्यूचे कारण उलगडणार आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा