तौक्ते वादळाच्या तडाख्यानंतर कोकणाचे होत्याचं नव्हत झालय. आंब्याच्या बागाच्या बागा नष्ट झाल्या आहेत. तर काहींचे संसारही पाण्याखाली गेले आहे. मात्र इतके सगळ होऊन सुद्धा अद्याप कोकणातील परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. अजूनही कोकणातील असंख्य भागात तुफान पाऊस पडत आहे. कोकणवासियांचे मोठे हाल होत आहे.
तौक्ते चक्रिवादळातून कोकणातला माणूस कुठेतरी सावरत असताना आज बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली खेड आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे आज सकाळपासून पावसाची मुसळधार सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.
दापोली मंडणगडमार्ग खोंडा परिसरा मध्ये पडत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टिमुळे झोपडपट्टीमध्ये रहाणाऱ्या नागरिकांच्या झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने अत्यंत दयनीय अवस्था ओढवली आहे. या नागरिकांचा अवघा संसार पाण्यात भिजून गेला आहे.त्यामुळे दापोलीतील झोपडपट्टी वासियांसमोर या समस्येतून कसे सावरायचे असा प्रश्न पडला आहे.
बागायतदारांचे १०० कोटींचे नुकसान
दरम्यान पहिल्या हंगामात फारसे उत्पादन नसल्यामुळे शेवटच्या हंगामावर भिस्त ठेवलेले कोकणातील आंबा बागायतदार तौक्ते चक्रीवादळात पूर्णत: होलपटले गेले आहेत. चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील आंबा बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाच, पण उत्पन्न देणारी झाडेही उन्मळून पडली आहेत. या दुहेरी अस्मानी संकटामुळे बागायतदारांचे १०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.