( Teachers Protest Azad Maidan ) आझाद मैदानात शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाची वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षकांकडून आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे.
पाच हजार विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये अधिवेशनात घेतला होता. त्यानंतर यासंदर्भात शासन निर्णयही काढण्यात आला होता. मात्र अजून देखील या शाळांच्या टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून 8 व 9 जुलै रोजी राज्यातील या पाच हजार शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. काल संध्याकाळपासून आमदार रोहित पवार शिक्षकांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून सरकार जोपर्यंत शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे.