महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांना अवघे काही तास शिल्लक असताना मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर ठाकरे बंधूंकडून धार्मिक निष्ठा दाखवली गेली. मतदानाच्या (१५ जानेवारी) एका दिवस आधी राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) उमेदवार प्रतिनिधींसोबत महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक यंत्रणा, मतदान दिवशीची तयारी, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि मतदारांशी समन्वय याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. प्रचाराचा धुरळा बसल्यानंतरही शिस्तबद्ध कामकाज आणि प्रत्येक मताचा सन्मान करण्याचा संदेश राज ठाकरेंनी दिला.
शिवतीर्थावरील बैठकीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कुटुंबासह मुंबईतील मुंबादेवी मंदिरात दर्शन घेतले. मुंबई नगरीची आई मानल्या जाणाऱ्या मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला यश मिळावे, अशी प्रार्थना केली. बुधवारी सकाळी मातोश्रीवरून राज ठाकरे कुटुंब शिवतीर्थावर गेले. तिथे शर्मिला ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तिळगूळ वाटप केले. यानंतर ठाकरे कुटुंब मुंबादेवी मंदिराकडे रवाना झाले. संजय राऊत हे राज ठाकरेंसोबत एका गाडीत दिसले, तर शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, जयजयवंती ठाकरे आणि रिता गुप्ता दुसऱ्या गाडीत होत्या.
मुंबादेवी दर्शनानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना ईव्हीएमबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. 'मतदारांनी सतर्क राहावे आणि एकही चूक होऊ देऊ नये,' असा त्यांचा स्पष्ट संदेश होता. हे देवदर्शन राजकीय वर्तुळात अर्थपूर्ण मानले जात आहे, कारण मतदानाच्या अंतिम टप्प्यात मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील समन्वय दिसून येत आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तिळगूळ वाटपाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून, निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला गेला.
महापालिका निवडणुकीचा निकाल १७ जानेवारी रोजी जाहीर होईल. ठाकरे बंधूंच्या या हालचालींमुळे मुंबईतील राजकारणात नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. कार्यकर्ते आणि मतदार शांततेने मतदान करतील, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.