थोडक्यात
सुषमा अंधारे फलटण पोलीस स्टेशनला जाणार
संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी करणार पोलिसांशी चर्चा
उपजिल्हा रुग्णालय, पोलीस ठाण्याला देणार भेट
(Satara Doctor case) सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या घटनेत धक्कादायक बाब समोर आली असून, डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावरच मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोन व्यक्तींची नावे लिहिली.
मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्या नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, "PSI गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार अत्याचार आणि लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केला". त्या महिला डॉक्टरने या दोघांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी दोन्ही आरोपींना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या सर्व घटनेमुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सुषमा अंधारे यांनी चलो फलटणचा नारा दिला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज सकाळी साडेदहा वाजता फलटणमध्ये दाखल होत आहेत.त्या फलटण पोलीस स्टेशनला जाणार असून संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी पोलिसांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या उपजिल्हा रुग्णालय, पोलीस ठाण्याला भेट देणार आहे. भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमधून सुषमा अंधारे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.