यवतमाळमधील महागाव तालुक्यातील वागद (इजारा) गावात आनंदाचे वातावरण काही क्षणांतच शोकमय झाले. मुलगी आयएएस पदावर निवड झाल्याच्या आनंदात मग्न असताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रल्हाद खंदारे असे त्यांच नाव आहे.
प्रल्हाद खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते. त्यांच्या मुलीने, मोहिनी खंदारे हिने, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचा मान पटकावला होता. या यशाच्या निमित्ताने खंदारे कुटुंबीय घरी आनंदोत्सव साजरा करत होते. याच वेळी प्रल्हाद खंदारे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.
तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिवारावर आणि गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिला, मुंबई जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश असलेले मुलगा विक्रांत, आयएएस पदावर निवड झालेली मुलगी मोहिनी, सून स्वाती आणि मोठा आप्त परिवार आहे.