अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनापूर्वी काल सत्ताधाऱ्यांकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला. सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेश वादळी ठरण्याची शक्यता असून राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक म्हणून जनतेने दिलेली जबाबदारी अधिकाधिक चांगल्याप्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करू.
सरकार पाशवी बहुमतात मश्गूल असताना राज्यात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार, अगदी मंत्र्यांची मुलगीही सुरक्षित नसणं, गुन्हेगारांना साथ देणाऱ्या आणि न्यायालयाने शिक्षा दिलेल्या मंत्र्यांना पदावर कायम ठेवण्याचा सरकारचा निगरगट्टपणा, सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांकडूनच महापुरुषांचा वारंवार अवमान केला जात असतानाही त्यांना संरक्षण देणं, तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी, भ्रष्टाचार, बेरोजगारी यासह इतर ज्वलंत प्रश्नांवर विरोधक म्हणून सरकारला जाब विचारू आणि निर्णय घेण्यास भाग पाडू. असे रोहित पवार म्हणाले.