(Maharashtra Rain) भारतीय हवामानशास्त्र विभागाने नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर 2025 या कालावधीसाठीचा दीर्घकालीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून सप्टेंबर महिन्यात मात्र पुन्हा एकदा समाधानकारक पावसाची नोंद होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
ऑगस्ट महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीच्या मर्यादेत म्हणजेच 94 टक्के ते 106 टक्के दरम्यान पावसाचे प्रमाण राहील, असा अंदाज आहे. राज्यात या कालावधीत काहीशी पावसाची कमी जाणवण्याची शक्यता असून विशेषतः नैऋत्य किनारपट्टी आणि मध्य भारताशी संलग्न भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होऊ शकते.
दुसरीकडे, सप्टेंबर महिन्यात देशभरात आणि राज्यातही सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांच्या एकत्रित कालावधीत देशात एकूण पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 106 टक्क्यांहून अधिक राहील. यामध्ये राज्याचाही समावेश असून सप्टेंबरमध्ये उशिरा होणारा पाऊस खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरू शकतो.
ऑगस्ट महिन्यात राज्यातील कमाल तापमान सामान्य ते किंचित अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून तापमानवाढीमुळे आर्द्रता आणि उकाड्यात वाढ होऊ शकते.