राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Violence) आज (5 मे) साक्ष नोंदवणार आहेत. याप्रकरणी त्यांना तिसरं समन्स प्राप्त झालं असून आज मुंबईत सुनावणी होणार आहे. त्यासाठी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पवार आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार असल्याचं कळतंय.
काही दिवसांपूर्वी या प्रकरणी शरद पवारांनी आपलं अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही नुकतंच आयोगापुढे सादर केलं होतं. तसेच, यापूर्वी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते. पण काही कारणास्तव ते हजर राहू शकले नाहीत. दरम्यान, आज भीमा कोरेगाव प्रकरणी ते आपली साक्ष नोंदवणार आहेत.
पुण्यातील (Pune) कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिल्ह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे (NIA) सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरूच आहे.
काय आहे प्रकरण?
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. दरम्यान, भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी हा हिंसाचार शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणी पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स आहे.
पवारांची साक्ष का? -
कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं आणि वस्तूस्थिती व पुणे पोलिसांचा तपास यामध्ये विरोधाभास असल्याचं वक्तव्य पवारांनी माध्यमांसमोर केलं होते. त्यानंतर आयोगाने पवारांचीही साक्ष नोंदवावी, अशी मागणी विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता. पण, पवारांनी यापूर्वी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोरेगाव भीमा हिंसाचार कोणामुळे घडले? याबाबत मला माहिती नाही. तसेच यामध्ये राजकीय हेतू होता, असे कोणतेही आरोप करायचे नाही, असं म्हटलं आहे.