मयुरेश जाधव | बदलापुरात सहाव्या मजल्यावर अडकलेल्या एका कबुतराची रेस्क्यू टीमने थरारक पद्धतीने सुटका केली. कबुतराच्या सुटकेचा हा थरार विडीओ मोबाईल कॅमेरात चित्रित झाला आहे.
बदलापूर पश्चिमेच्या बदलापूर गाव, चिंतामणी चौक परिसरात मोतीराम लेक व्ह्यू कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये सहाव्या मजल्यावर असलेल्या एका बंद घराच्या बाल्कनीत कबुतर अडकून पडलं होतं. या कबुतराच्या पायाला असलेला तंगूस बाल्कनीतल्या एका हुकला अडकला होता. अनेक तास कबुतराची सुटकेसाठी सुरू असलेली धडपड इथल्या काही रहिवाशांच्या लक्षात आली आणि त्यांनी ही बाब बदलापूर रेस्क्यू टीमचे सदस्य मनोहर मेहेर आणि परेश पानसरे यांना कळवली. यानंतर रेस्क्यू टीमचा एक सदस्य या इमारतीच्या टेरेसवरून कमरेला दोरी बांधून खाली सहाव्या मजल्यावर उतरला आणि कबुतराची सुटका केली. हारनेस, हेल्मेट अशी कोणतीही सुरक्षात्मक साधनं नसतानाही या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत कबुतराचा जीव वाचवला. हा सगळा थरार सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांनी मोबाईल कॅमेरात चित्रित केला. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बदलापूर रेस्क्यू टीमच्या सदस्यांचं कौतुक होतंय.