मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन चौथ्या दिवशी अधिक तीव्र झालं आहे. विकेंड आणि गणेशोत्सवाच्या सुट्ट्यांमुळे मागील दोन दिवस आंदोलनाचा सामान्य मुंबईकरांवर मोठा परिणाम झाला नाही. मात्र, आता सोमवारी कामकाजाचा दिवस असल्याने या आंदोलनाचा थेट परिणाम प्रवाशांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत मध्य रेल्वेच्या काही महत्त्वाच्या स्थानकांवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून रेलरोको केला जाऊ शकतो. बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे आणि दादर या गर्दीच्या स्थानकांवर आंदोलक ट्रॅकवर उतरण्याची शक्यता असून यामुळे लोकल सेवा विस्कळीत होऊ शकते.
दररोज लाखो प्रवासी कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, विरार आणि बोरिवलीसारख्या भागांतून लोकलने मुंबईत नोकरीसाठी येतात. सकाळच्या गर्दीच्या वेळी जर रेल्वे सेवा ठप्प झाली तर प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागेल. कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून, सरकारने मागण्या मान्य न केल्यास ते उद्यापासून पाणीही न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. "ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही," असा त्यांचा पुनरुच्चार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ उपसमिती चर्चा सुरू असून, गरज पडल्यास नवीन प्रस्ताव देण्याचे संकेत समिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मात्र, तोपर्यंत मुंबईकरांनी सोमवारी सकाळी लोकल प्रवासासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरणार आहे.