थोडक्यात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
भातन-अजिवली दरम्यान वीजवाहिन्यांचे, फिडर टाकण्याचे काम
दुपारी दोन - तीन वाजेपर्यंत वाहतूक बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. आज दुपारी 2 ते 3 या वेळेत भातनजवळ एक तासासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हे बंदोबस्त महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वीजवाहिनी दुरुस्ती व फिडर टाकणीच्या कामासाठी करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
या कालावधीत कि.मी. 09.600 ते 09.700 दरम्यान पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेनवरील सर्व प्रकारची वाहतूक (हलकी व अवजड) थांबवली जाणार आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार अधिसूचना काढली असून, वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस पथके सज्ज आहेत. काम पूर्ण होताच रस्ता पुन्हा सुरु होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
पर्यायी मार्गांनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने कळंबोली सर्कल किंवा शेड्रग एक्झिटमधून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर वळवली जातील. तर पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने खोपोली किंवा खालापूर टोल नाक्यावरून महामार्ग क्र. 48 वर वळवली जातील. या उपाययोजनांमुळे प्रवाशांना तात्पुरती असुविधा होईल, मात्र वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.