(Tuljabhavani Temple) आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक तुळजापूरला गर्दी करतात. मात्र, मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्ट 2025 पर्यंत बंद ठेवण्याचे घोषित केले आहे. यामुळे भाविकांना केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिरातील गाभाऱ्याच्या संवर्धन व जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्यासाठी 1 ते 10 ऑगस्टदरम्यान गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काम अपूर्ण असल्यामुळे ही मुदत आणखी 10 दिवस वाढवण्यात आली आहे.
यामुळे 20 ऑगस्टपर्यंत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही. मात्र, मुखदर्शन, सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. मंदिर संस्थानकडूनही भाविकांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून दर्शनाच्या नियोजनात अडथळा येणार नाही.
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातूनही हजारो भाविक रोज देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात. गाभाऱ्यातील दर्शन बंद असल्याने मुखदर्शन रांगेत प्रतीक्षा काल वाढू शकतो. भाविकांनी संयम राखून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 20 ऑगस्टनंतर गाभाऱ्यातील नियमित दर्शन सुरू होण्याची शक्यता असून, पुढील निर्णय मंदिर संस्थान आणि पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल.