महाराष्ट्रात उद्या रात्री ८ वाजल्यापासून कडक संचारबंदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यासाठी त्यांनी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये राज्यातील गोरगरीबांना निर्बंध लागू झाल्यापासून एक महिना मोफत तीन किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत. याचसोबत शिवभोजन थाळी मोफत मिळणार असून सरकारी योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मिळणार आहेत. बांधकाम कामगारांना १५०० रुपये मिळणार आहेत. तसेच अधिकृत फेरिवाल्यांनाही दीड हजार रुपये देणार आहे. परवानाधारक रिक्षाचलाकांनीही दीड हजार रुपये, आणि खावटी योजनेचा लाभ घेणाऱ्या आदिवासींनाही 2 हजार रुपये देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय.
5 हजार 476 कोटींचा निधी
कोविड संदर्भातील सुविधा उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 330 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत. तसेच या सर्व पॅकेजसाठी 5 हजार 476 कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हवाईमार्गाने ऑक्सिजन आणणार
पंतप्रधानांशी माझी नुकतीच बैठक झाली आहे. त्यात त्यांना ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांच्याकडे केला आहे. त्यांनी परवानगीही दिली आहे. मात्र, ईशान्येकडील राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावं लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणं परवडणारं नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गाने ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी. मी फेसबुकवरून तुमच्या माध्यमातून पंतप्रधानांना आवाहन करत आहे. आणि त्यांना पत्र लिहूनही मागणी करणार आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
15 दिवस संचारबंदी
राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 15 दिवस ही संचारबंदी राहणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच या संचारबंदीतून अत्यावश्यक सुविधा वगळण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.