राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. आज 16 जानेवारीपासून मतमोजणी सुरू असून हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे. सुरुवातीच्या निकालांवरून मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे गटाची कामगिरी उजवी ठरत असल्याचे दिसते.
निवडणुकीआधी एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतील अनेक नगरसेवक आपल्या बाजूला वळवले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत केलेली युती निर्णायक ठरल्याचे संकेत मिळत आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा फायदा थेट निकालांत दिसून येतोय.
आतापर्यंतच्या आकड्यानुसार मुंबईत उद्धव ठाकरे गट सुमारे 50 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे, तर शिंदे गट 20 च्या आसपास जागांवर पुढे आहे. भाजपही मोठ्या संख्येने आघाडीवर असून मनसेनेही काही जागांवर चांगली कामगिरी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूरमध्येही वेगवेगळ्या पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एकूणच या निवडणुकांनी राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत.