महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या धुरात शिवाजी पार्क येथील संयुक्त सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लाख रुपयांचा चॅलेंज दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या २० वर्षांनंतरच्या एकजुटीत बोलताना उद्धव यांनी भाजपवर सडकून टीका केली. फडणवीस म्हणतात, उद्धवचं एक विकासाचं भाषण दाखवा म्हणजे हजार देतो; नको चोराचा पैसा. मी चॅलेंज देतो मोदींपासून तुमचे चेला-चपळ्यांचं हिंदू-मुस्लिम न करता केलेलं एक भाषण दाखवा, मी एक लाख रुपये देतो असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांवर सडकून टीका केली.
भाषणाची सुरुवात करताना उद्धव म्हणाले, “राज म्हणाले ‘मराठी बांधवांनो’, मी म्हणतो ‘हिंदू बांधवांनो’—हेच आमचं म्हणणं. फडणवीस ‘हिंदू महापौर’ म्हणतात, ते हिंदू आहेत का? डोकं तपासा, सर्टिफिकेट पहा. राज सांगितले पोटभर जेवण देईन, पण पोटतिडकी नव्हे, डोक्याला तिडकी लागली पाहिजे. शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी नाही.” बालपणीच्या आठवणी सांगत ते म्हणाले, “मातोश्रीच्या मांडीवर बसून बाळासाहेबांचं ऐकलं, आज ठाकरे खांद्यावर धुरा. जयंतराव भावकी एक झाली, आता गावकी एक. ठाकरे अस्तित्व ठरवणारे जन्मालाही आले नाहीत; ही लाचार माकडं वाघ होऊ शकत नाहीत.”
मुंबई महापालिकेसाठी मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीने महायुतीला, भाजप-शिवसेना (शिंदे गट) कठीण आव्हान दिले आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, या सभेने मराठी अस्मिता आणि विकासाच्या मुद्द्यांवर जोर दिला. ठाकरे बंधूंच्या एकजुटीमुळे प्रचाराला नवसंजन मिळाले असून, निकालाची उत्सुकता वाढली आहे.