थोडक्यात
मराठवाड्याच्या दौऱ्याची सांगता करताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर घणाघात केला.
कोणतंही बटन दाबा, पण मत भाजपालाच जातं… अशी लोकशाही भारतात निर्माण झाली आहे,” अशी टीका केली.
मागील चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.
Uddhav Thackeray On Parth Pawar Pune Land Scam : मराठवाड्याच्या दौऱ्याची सांगता करताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर घणाघात केला. शेतकऱ्यांच्या वेदना आणि अन्यायाचा मुद्दा घेऊन ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांना लक्ष्य केले. “कोणतंही बटन दाबा, पण मत भाजपालाच जातं… अशी लोकशाही भारतात निर्माण झाली आहे,” अशी टीका करत त्यांनी जनतेला जागे राहण्याचं आवाहन केलं.मागील चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. “मी स्वतः शेतकरी नाही, पण शेतकऱ्यांच्या दु:खाशी मी जोडलेलो आहे. शेती उद्ध्वस्त झाली, माती वाहून गेली, पण सरकार झोपेत आहे,” असं ते म्हणाले. अजूनही कर्जमाफीचा निर्णय न झाल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “जर आता कर्जमाफी केली नाही, तर मग कधी करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पार्थ पवार प्रकरणावरूनही उद्धव ठाकरेंनी थेट टीका केली. “मतचोरीनंतर आता हे जमीन चोरी करत आहेत,” असा आरोप त्यांनी भाजपवर केला. "शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेतली जात आहे, आणि हीच मंडळी स्वतःला शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणवतात केंद्रीय पथक आलं का तुमच्या दारात? परदेशी समिती आली का? नाही आली. कारण तुमचं दुःख त्यांच्या अजेंड्यावर नाही. पण निवडणुका आल्या की मोदीजी काहीतरी पॅकेज घेऊन येतील.” बिहारचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरही टोला लगावला “देवेंद्र फडणवीस म्हणतात, पंतप्रधानांचं सर्वाधिक प्रेम बिहारवर आहे. मग महाराष्ट्रावर का नाही?”
शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी अदानी गटाला मिळालेल्या विशेष सवलतींवर प्रहार केला. “कल्याण-डोंबिवलीमध्ये अदानीसाठी नियम बदलले, पण शेतकऱ्यांसाठी नियम शिथिल करायला सरकार तयार नाही,” अशी टीका त्यांनी केली. शेवटी ठाकरे यांनी जनतेला थेट संदेश दिला “मोदीजींनी नोटबंदी केली, आता महायुतीसाठी मतबंदी करा! कर्जमाफी आणि नुकसानभरपाई होईपर्यंत मत नको. आत्महत्या करू नका, लढा द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत.”