मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली करण्यात आली. सुधाकर शिंदे यांना मूळ खात्यामध्ये परतण्याचे केंद्राने आदेश दिले. 8 वर्षांच्या डेपुटेशनवर राज्य सरकारमध्ये ते आले होते. सुधाकर शिंदेंना तात्काळ केंद्राच्या सेवेत रुजू व्हावं लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे. याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, नोव्हेंबर २०२३ पुढे सुधाकर शिंदे यांना सेवेत वाढ देता येणार नाही हा स्पष्ट उल्लेख बदलीच्या आदेशात करण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या आठ महिन्यात सुधाकर शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? हे देखील आता सरकारने स्पष्ट केले पाहिजे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.