(Mumbai Dam Water Level ) यंदा मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या आधीच महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यामुळे यंदा मुंबईमध्ये पाणी कपात होणार नाही अशी मुंबईकरांना आशा होती. मात्र तलाव क्षेत्रामध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.60 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्यास मुंबईकरांना दहा ते पंधरा टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.
तलावातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे सध्या राखीव साठ्यातून मुंबईला पाणी पुरवणठा करण्यात येत आहे. मात्र असे असले तरी फार काळ या राखीव कोट्यातील पाणीसाठा वापरणे शक्य नाही. आठवड्याभरामध्ये तलाव क्षेत्र पूर्ण क्षमतेने भरले नाही तर महापालिकेसमोर पाणी कपात करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची माहिती मिळत आहे. तलावाच्या पाणी क्षेत्रामध्ये सध्या समाधानकारक पाऊस पडत नाही त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचा सल्ला महानगरपालिकेने दिला आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस जरी होत असला तरी मुंबईकरांना पुढचे काही दिवस पाणी हे जपून वापरावे लागणार आहे.
धरणातील पाणीसाठ्याची स्थिती
उर्ध्व वैतरणा: 0.91 टक्के
मोडक सागर: 26.05 टक्के
तानसा: 9.39 टक्के
मध्य वैतरणा: 10.67 टक्के
भातसा: 6.00 टक्के
विहार: 33.30 टक्के
तुळशी: 28.62 टक्के